मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे, १९९२ रोजी “राज्य मराठी विकास संस्थेची” स्थापना केली. संस्था नोंदणी अधिनियम, १९६० रोजी संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे स्वायत्त संस्था म्हणून नोंदणी झाल्यावर १ मे, १९९३ पासून संस्थेच्या कामकाजास प्रत्यक्ष सुरुवात झाली. संस्थेचे कामकाज तिच्या नियामक मंडळाच्या सल्ल्यानुसार चालते. महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री हे संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष आणि मा. मंत्री, मराठी भाषा, पदसिध्द उपाध्यक्ष असून मंडळावर एकूण २१ अशासकीय सदस्य कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यालय एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय, ३-महानगरपालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई ४००००१ येथे आहे. विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा व मराठी भाषेच्या अधिवृध्दीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करण्यासाठी भाषा व संस्कृतीच्या क्षेत्रात मराठी भाषेच्या अभिवृध्दीसाठी काम करणा-या विविध शासकीय व अशासकीय संस्थांमध्ये समन्वय राखून त्या संस्थांच्या सहाय्याने काही उपक्रम संस्था पार पाडते. राज्य मराठी विकास संस्थेची अधिक माहिती https://rmvs.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.