नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी !
नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी !
तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला
अगे भक्तिसोपान सोपा भला
दुजा वेद तूं ! धन्य तूं वैखरी !
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 1

प्रतापी तुझ्या मंत्रतेजोबलें
मराठी स्वराज्या असे स्थापिलें
अशी धन्य तूं वीरधात्री खरी !
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 2

तुझी माधुरी मोदमात्रावहा
फुलांनी, मुलांनी खुले गे अहा !
कसें प्रेम साठे तुझ्या अंतरी !
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 3

तुका-ज्ञानबा-दास-मोरेश्वरा
नमो कृष्ण-रामा नमो भास्करा
तुझे लाडके हे धरावे शिरीं
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 4

– रा.अ.काळेले

प्रतिक्रिया व्यक्त करा

X