आवाहन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी साहित्य संस्था/मंडळांसाठी अर्थसाहाय्य करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार दिनांक १४.०६.२०२२ च्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त मराठी साहित्य संस्था /मंडळे सदर शासन निर्णयातील परिच्छेद २ (२) मध्ये नमूद केलेल्या अटी-शर्तीच्या अधीन राहून अर्थसाहाय्य/ अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील, महाराष्ट्र शासनाने दि. १० जुलै २००८ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी साहित्य संस्था/मंडळे ह्यांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.
त्यानुसार “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसाहाय्य” ही योजना मराठी भाषा विभागाच्या अधिनस्त राज्य मराठी विकास संस्था यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे.
मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. कसीयो-१०१२/प्र.क्र.१३९/२०१२/भाषा-३, दि. २१.०१.२०१३ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनातर्फे एक खास बाब म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी साहित्य संस्थांना शासनाच्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या/ पात्र ठरणाऱ्या मराठी साहित्य संस्था/मंडळांना अर्थसाहाय्य करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
प्रस्तावना :-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील, महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृद्धी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी साहित्य संस्थांना सन २०२५-२६ मध्ये १ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे.
राज्य मराठी विकास संस्थेने या योजनेअंतर्गत, निश्चित केलेल्या विहित कार्यपद्धती व निकषांना अनुसरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त पात्र मराठी साहित्य संस्था/मंडळांना रु. १०.०० लक्षच्या कमाल मर्यादेत अनुदान करण्यात येणार आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या याजनेंतर्गत दिनांक १०/०७/२०२५ ते १०/०८/२०२५ या कालावधीत, विहित नमुन्यात गुगल अर्जाद्वारे (Google Form) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी साहित्य संस्था/मंडळांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेची कार्यपद्धती व निकष, मार्गदर्शक सूचना, विहित अर्जाचा नमुना इतर तपशील राज्य मराठी विकास संस्थेच्या https://rmvs.marathi.gov.in या तसेच महाराष्ट्र शासनाच्या
http://maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसाहाय्य योजना” या शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कालमर्यादेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
खालील लिंकवर क्लिक करून आवाहन, अटी व शर्तींबाबतची धारिका (File) डाऊनलोड (Download) करावी.
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसाहाय्य योजना”