मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच समाजामधे मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता तिसरे "विश्व मराठी संमेलन" दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी रोजी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्याचे मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी योजिले आहे. अभिजात मराठी ही या विश्व मराठी संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून त्याअनुषंगाने या कालावधीत विविध भाषा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत...

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कला यांना एक दीर्घ परंपरा व स्वतंत्र ओळख आहे. महाराष्ट्राच्या या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरीक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे एक भव्य स्नेहसंमेलन संपन्न व्हावे, असा महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. या संमेलनात मराठी संस्कृती व मराठी भाषा यांचेबाबत चर्चासत्र, मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे नाट्यसंगीत, वादन इ. विविध कलांचा अविष्कार त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे.