मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस “भाषा संवर्धन पुरस्कार” प्रदान करण्याचा निर्णय सन २०१५ पासून घेण्यात आला आहे. त्यानुसार (१) मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व (२) मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हे दोन पुरस्कार राज्य शासनामार्फत प्रदान करण्यात येतात. या बाबत अधिक माहितीसाठी या विभागाचा शासन निर्णय क्र. भासंपु-२०१६/प्र.क्र.२६/२०१६/भाषा-३, दि. १८ फेब्रुवारी, २०१६ पहावा.
मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ.अशोक केळकर यांचे नांवे “मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रु.१,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
मराठी भाषा संवर्धक पुरस्कार : कवितेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांवरील आबालवृध्दांपर्यंत सहजसोप्या भाषेत मराठी भाषा संवर्धनाचे लक्षणीय कार्य केलेल्या व्यक्तीस/संस्थेस कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचे नांवे “मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रु.१,00,000/- ( रुपये एक लक्ष फक्त ) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.