जशी मायभूमी तशी मातृभाषा असे वंद्य आम्हांस त्रैलोकिंही
नव्या भारताचा नकाशा पहा तो असे आद्यभूमी महाराष्ट्र ही !
अहा ! ही मराठी किती रम्य मंजूळ वाणी असे प्राण गे जीवनीं
जिने घेतला वारसा ज्ञानदेवे मुखांतून गीर्वाण भाषेंतुनी !!

अये आज आम्ही तुला भूषवाया पुढें ठाकलो एक होऊनिया
अता ना कुणाची अम्हां रोधण्याला पहा छाति होईल येऊनिया |
अम्हाला हवी राजभाषा तशी राजभूमी अखंडीत या हिंदवी
जिची गर्जना ऐकुनी ज्ञानराजा-तुकाबादि येतील पुन्हां महीं !!

मयूरासनी मान होता तुझा गे, परी विश्वविद्यालयीं ये अता
तुझें भाग्य तें लोकशाहीं उदेलें, किती उच्च स्वातंत्र्य लाभे मतां !
मराठीचिया मंदिराला झराळे नवद्वार दाही दिशेला पहा –
नवें ती अलंकार-वृत्तादि-जाती, कला-शास्त्र येईल घेऊनिया !!

मराठी, मराठी ! मराठाच बाणा ! महाराष्ट्र पुत्रास शोभा जनी !
महाराष्ट्र पुत्रां ! मराठी गिरा ही सदा वाहु द्या सह्यशैलाहुनी !!

– तु.ना.काटकर

Leave a Reply